नाशिक: गणेशोत्सवासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त; नाशिकमधील ४०२ सराईत गुन्हेगार तडीपार

नाशिक। दि. १४ सप्टेंबर २०२६: गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी नाशिक पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईला वेग देण्यात आला आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत कारवाई करत ४०२ सराईत गुन्हेगार आणि टवाळखोर संशयितांना २७ सप्टेंबरपर्यंत शहरातून तडीपार करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक पकडली; १२.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

गणेशोत्सवाला आजपासून (दि. १४) सुरुवात होत असून, सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करू शकणाऱ्या, उपद्रव घडवून आणण्याची शक्यता असलेल्या किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचवू शकणाऱ्या व्यक्तींविरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना तीव्र केल्या आहेत.

परिमंडळनिहाय तडीपारीची कारवाई:
पोलिसांच्या माहितीनुसार, परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या कार्यक्षेत्रात १२७ जणांवर, तर परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त किशोर काळे यांच्या कार्यक्षेत्रात २७५ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात संभाव्य उपद्रवाला आळा घालण्याच्या दृष्टीने पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात पावसाची पुन्हा हजेरी; घाटमाथ्यावर आज ‘यलो अलर्ट’

दरम्यान, उत्सव काळात शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रमुख रस्ते, गर्दीची ठिकाणे आणि संवेदनशील परिसरात वाहनांद्वारे तसेच पायदळ गस्त वाढविण्यात आली आहे. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी संवेदनशील भागांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

शहरातील प्रमुख मार्ग, गर्दीची ठिकाणे आणि महत्त्वाच्या परिसरांवर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून २४ तास देखरेख ठेवली जाणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790