Amazon

नाशिककरांसाठी खुशखबर! एसी ई-बसमधून आरामदायी प्रवास; भाडे मात्र पूर्वीइतकेच, १५ सप्टेंबरपासून सेवा सुरू

नाशिक। दि. १२ सप्टेंबर २०२६: पीएम-ई बस सेवा योजनेंतर्गत नाशिक शहरात दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बसेस अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. शहरातील ५० ई-बसेसपैकी पहिल्या टप्प्यातील बससेवा मंगळवार, १५ सप्टेंबरपासून दोन प्रमुख मार्गांवर सुरू केली जाणार आहे. विशेष म्हणजे या बसेसमध्ये वातानुकूलित (एसी) सुविधा उपलब्ध असली, तरी प्रवाशांना सध्याच्या बस भाडेदरानुसारच प्रवास करता येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  महावितरणची ‘अभय योजना’ जाहीर! थकित वीजबिलांवरील व्याज-दंड १००% माफ; मूळ रकमेतही २०% पर्यंत सूट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २८ ऑगस्ट रोजी ई-बसेसचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर बसेसचे आरटीओ पासिंग, तांत्रिक तपासणी आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे आता या बसेस नियमित प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज झाल्या आहेत.

पहिल्या टप्प्यात मार्ग क्रमांक १०२ वर तपोवन टर्मिनस ते अशोकनगर, तर मार्ग क्रमांक १०३ वर तपोवन टर्मिनस ते सिम्बायोसिस कॉलेज या मार्गावर ई-बसेस धावणार आहेत. या दोन्ही मार्गांवर शहरातील जुना आडगाव नाका, सीबीएस, रविवार कारंजा, राजीव गांधी भवन, वेद मंदिर, पवननगर यांसह महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे.

🔎 हे वाचलं का?:  गोदावरी प्रदूषणावरून उच्च न्यायालयाची राज्य सरकारवर नाराजी; २१ नोव्हेंबरपर्यंत कृती अहवाल सादर करण्याचे आदेश

दरम्यान, पहिल्या टप्प्यातील सेवेला प्रतिसाद मिळाल्यानंतर उर्वरित ई-बसेसही टप्प्याटप्प्याने शहरातील विविध मार्गांवर सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे नाशिककरांना पर्यावरणपूरक, शांत आणि एसी सुविधेचा आरामदायी प्रवास उपलब्ध होणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790