नाशिक: १३ प्रमुख आखाड्यांपलीकडेही धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांकरीता मिळणार रु १५ लाखांपर्यंत निधी

नाशिक। दि. १३ ऑगस्ट २०२६: नाशिकमधील ३ आणि त्र्यंबकेश्वरमधील १० प्रमुख आखाड्यांपलीकडे आता इतर आखाडे, त्यांच्याशी संलग्न आश्रम, मंदिरे, संस्थाने आणि महत्त्वाच्या धार्मिक स्थळांनाही सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार आहे. यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने प्रमाणित कार्यपद्धती (SOP) निश्चित केली आहे.

या अंतर्गत संबंधित धार्मिक संस्था व स्थळांवर भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पात्र संस्थांना कमाल १५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. कुंभमेळ्याच्या काळात भाविकांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, तसेच निधीचे नियोजनबद्ध वितरण व्हावे, या उद्देशाने ही प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमासाठी मतदारांनी १७ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरावेत

सर्व संबंधित संस्थांनी निर्धारित नमुन्यातील प्रस्ताव २५ ऑगस्ट २०२६ पर्यंत सादर करावेत. प्राप्त प्रस्तावांची स्थानिक समित्यांकडून ३१ ऑगस्टपर्यंत प्राथमिक छाननी करून पुढील कार्यवाहीसाठी कुंभमेळा प्राधिकरणाकडे पाठविण्यात येणार आहे.

दोन स्तरांवर प्रस्तावांची छाननी:
प्रमाणित कार्यपद्धतीनुसार नाशिक महापालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र स्थानिक समिती, तर नाशिक जिल्ह्यातील महापालिका क्षेत्राबाहेरील ठिकाणांसाठी जिल्हास्तरीय स्थानिक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समित्यांकडून प्रस्तावांची प्राथमिक छाननी केल्यानंतर ते कुंभमेळा प्राधिकरणाच्या स्तरावरील समितीकडे पाठविण्यात येतील. नाशिक जिल्ह्याबाहेरील ठिकाणांकरिता सर्व अधिकार प्राधिकरणस्तर समितीला असतील.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाने बनावट वर्कऑर्डर; तीन कोटींची फसवणूक उघड; दोघांना अटक

कुंभमेळा प्राधिकरणस्तरीय समिती कुंभमेळा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावांचे एकत्रित परीक्षण करेल. त्यानंतर आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून शिफारशी कुंभमेळा प्राधिकरणाच्या प्रशासकीय मंजुरीसाठी सादर केल्या जातील.

स्थानिक समित्यांच्या बैठका दरमहा घेण्यात येणार असून, त्यानंतर प्राधिकरणस्तरीय समितीचीही दरमहा बैठक घेऊन प्रस्तावांवर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. भाविकांसाठी दिल्या जाणा-या सुविधांवर याद्वारे भर दिला जाणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  भारतात अनधिकृतपणे प्रवेश करून नाशिकमार्गे पुण्याला जाणाऱ्या २ बांगलादेशींना अटक !

संबंधित संस्थांनी निर्धारित नमुन्यात प्रस्ताव सादर करताना प्रस्तावित स्थळाची माहिती, सध्याच्या सुविधा, कुंभमेळ्याच्या काळातील अपेक्षित भाविकसंख्या, आवश्यक सुविधा आणि प्रस्तावित कामांचा तपशील सादर करायचा आहे.

यामध्ये निवास व्यवस्था, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, पार्किंग, आरोग्य सुविधा आणि आपत्कालीन व्यवस्थापनाशी संबंधित सुविधा यांचा समावेश करता येणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात भाविकांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या माध्यमातून धार्मिक संस्थांसोबत समन्वय वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790