भारतात अनधिकृतपणे प्रवेश करून नाशिकमार्गे पुण्याला जाणाऱ्या २ बांगलादेशींना अटक !

नाशिक। दि. १३ ऑगस्ट २०२६ : बांगलादेशातून बेकायदेशीर मार्गाने भारतात प्रवेश करून आसाममार्गे रेल्वेने नाशिक रोड येथे आलेल्या आणि पुढे पुण्याला जाण्याच्या तयारीत असलेल्या बांगलादेशी दाम्पत्याला गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने कारवाई करत ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बनावट आधारकार्ड आढळून आले असून, हे कागदपत्र तयार करून दिल्याच्या आरोपावरून पुण्यातील एका महिलेविरुद्धही नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आसामहून रेल्वेने एक बांगलादेशी पुरुष आणि महिला नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट-२चे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करून त्यांनी पथकाला तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कुंभाच्या गर्दीपूर्वी आपत्ती प्रतिसाद व्यवस्थेचा ‘ग्राउंड चेक’; घाटांची संयुक्त पाहणी

त्यानुसार मंगळवारी (दि. ११) सायंकाळी नाशिक रोड बसस्थानक परिसरात पोलिसांनी पाळत ठेवली. यावेळी रेल्वेतून उतरलेले एक महिला-पुरुष घाईघाईने बसस्थानकाच्या दिशेने जाताना पथकाच्या निदर्शनास आले. ते पुण्याला जाण्यासाठी बस पकडण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी नाशिक रोड दामिनी पथकातील महिला पोलिस अंमलदारांच्या मदतीने दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांची नावे नाहिदा बादशाह मुल्ला (२१) आणि मोहम्मद साकीब मुल्ला (२२) अशी असल्याचे समोर आले. दोघेही बांगलादेशातील खुलना राज्यातील नराईल जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडे भारतात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही वैध प्रवासी कागदपत्रे आढळली नाहीत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाने बनावट वर्कऑर्डर; तीन कोटींची फसवणूक उघड; दोघांना अटक

दरम्यान, नाशिक रोड पोलिसांनी केलेल्या चौकशीत नाहिदाने यापूर्वी पुण्यातील बालाजीनगर परिसरात पायल शिंदे नामक महिलेच्या घरी सुमारे सहा महिने वास्तव्य केल्याची माहिती दिली. या काळात ती तेथे काम करत होती, असेही तपासात समोर आले.

नाहिदा त्यानंतर बांगलादेशात परतली. पुढे पती मोहम्मद साकीब मुल्ला याच्यासोबत तिने कथितरित्या बेकायदेशीर मार्गाने भारतात प्रवेश केला. आसाममार्गे रेल्वेने नाशिक रोड गाठल्यानंतर दोघे पुण्याकडे रवाना होण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांच्या कारवाईत अडकले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक-नांदुरी रस्त्याच्या रुंदीकरण कामाची पाहणी; गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

बनावट आधारकार्ड उपलब्ध करून दिल्याच्या आरोपावरून पुण्यातील पायल शिंदे हिच्याविरुद्धही नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790