नाशिक (प्रतिनिधी) : शहरात ऑक्टोबर महिन्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. ही बाब दिलासादायक असली तरी, कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात होणारी नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने ‘नो मास्क, नो एन्ट्री’ ची मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत मास्क न परिधान केलेल्या ग्राहकांना दुकानात प्रवेश दिल्यास दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार आहे.
शहरात कोरोनाने जून महिन्यानंतर थैमान घातले होते. बाधितांच्या संख्येत तसेच मृतांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. मात्र, सध्याच्या परिस्थितीत कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे नागरिक निष्काळजीपणे शहरात वावरतांना दिसतात. खास करून मास्कचा वापर आणि सुरक्षित अंतर या नियमांचे पालन नागरिकांकडून होतांना दिसत नाही.
तर दुसऱ्या बाजूला नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आरोग्यतज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने विशेष काळजी घेतली जात आहे. दरम्यान शहरातील कोणतेही कोविड सेंटर अद्याप बंद केलेले नाही. उलट बिटको रुग्णालयात खाटांची संख्या वाढवली जात आहे. ‘नो मास्क, नो एन्ट्री’ मोहीम राबवण्यासाठी महापालिकेच्यावतीने पथके तैनात करण्यात येणार आहेत. तसेच याबाबतीत नागरिकांवर व दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची देखील मदत घेण्यात येणार आहे.