नाशिक (प्रतिनिधी) : नंदिनी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ७० वर्षे वय असलेल्या सतीश कुलकर्णी आणि चांद्रकिशोर पाटील यांनी केलेले निर्माल्य संकलनाचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शुभेच्छापत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सतीश कुलकर्णी आणि चंद्रकिशोर पाटील यांचा सत्कार केला.
याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सर्वच स्तरावर वेगवेगळे नियोजन करून प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला पाहिजे. दसरा सणाच्या निमित्ताने घरोघरी बसविलेले घट तसेच देवीचे निर्माल्य यांचे विसर्जन नदीपात्रात केले जाते. उंटवाडी येथील नंदिनी नदीच्या पुलावर सतीश कुलकर्णी आणि चंद्रकिशोर पाटील यांनी सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठ सलग दहा तास स्वतः उभे राहून ट्रॅक्टरभर निर्माल्य संकलित केले. त्यांनी स्वतःहून केलेल्या कार्यातून समाजाला प्रेरणा मिळाली आहे. कुलकर्णी यांनी वयाच्या 70व्या वर्षी उत्साह टिकून ठेवत तरुणाला लाजवेल असे कार्य केलेले असल्याचेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.
व्यवस्थेमधील दोष अनेकांना दिसत असतात परंतु ते दूर करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने काम करणारे श्री पाटील व श्री कुलकर्णी हे समाजासाठी दीपस्तंभ आहेत असे गौरवोद्गार मांढरे यांनी काढले. श्री पाटील आणि कुलकर्णी यांना दिलेल्या व्यक्तिगत पत्रात श्री मांढरे यांनी आपल्यासारखे नागरिक हे देशाची खरी संपत्ती असल्याचा उल्लेख केला आहे.
0000