नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील औषध दुकानदाराकडून २ लाख रुपये रक्कम असलेली बॅग लुटणाऱ्या दोघांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे. विशाल वासवानी यांनी केलेल्या तक्रारीनुसार, गंगापूर रोडवर त्यांचे दर्पण मेडिकल स्टोअर्स आहे. वासवानी रात्री दुकान बंद करून, घरी जात असताना २ संशयित आरोपी सुरज आहिरे (रा.शिवाजीनगर, सातपूर) व अविनाश रणदिवे (रा. मल्हारखान) या दोघांनी वासवानी यांची कार थांबवली.
बळजबरीने २ लाखांची रक्कम असलेली बॅग हिसकावून घेत, आमच्या गँगला ओळखत नाही का? असे सांगून पळ काढला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असता पोलिस पथकाने संशयितांचा त्वरित शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रशांत मरकड यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ एकाला गंगापूर रोडवरून तर, दुसऱ्याला मल्हारखान झोपडीतून पकडले. संशयितांकडून संबंधित रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.