नाशिक: रेल्वे लेव्हल क्रॉसिंग व्यवस्थापनासाठी कुंभमेळा प्राधिकरणाकडून संयुक्त सर्वेक्षणांना सुरुवात

नाशिक। दि. ३१ जानेवारी २०२६: सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान भाविक तसेच वाहनांच्या सुरक्षित, सुरळीत व अखंड वाहतूक व दळणवळण सुनिश्चित करण्यासाठी नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या रेल्वे लेव्हल क्रॉसिंगच्या व्यवस्थापनासाठी समन्वयित नियोजन प्रक्रिया सुरू केली आहे.

जुलै ते सप्टेंबर २०२७ या कालावधीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी अपेक्षित असून रेल्वे व रस्ते वाहतुकीत लक्षणीय वाढ होणार आहे. या पार्श्वभूमीवर, विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन करताना रेल्वे वाहतूक अखंड सुरू राहील आणि सार्वजनिक सुरक्षिततेसह वाहतूक व्यवस्थापन प्रभावी राहील, यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाकडून नियोजन करण्यात येत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवन वृक्षतोड प्रकरणी १७ फेब्रुवारीला सुनावणी, मनपाने लेखी हमी देण्याची मागणी

या अनुषंगाने, उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत व्यस्त रेल्वे लेव्हल क्रॉसिंगवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये रेल्वे उड्डाणपूल (ROB), रेल्वे अधोमार्ग (RUB), मर्यादित उंचीचे भुयारी मार्ग उभारणी तसेच आवश्यक ठिकाणी कुंभमेळा कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात लेव्हल क्रॉसिंग बंद ठेवून नियोजित पर्यायी वाहतूक मार्गांचा वापर करण्याबाबत सविस्तर विचारमंथन झाले.

मध्य रेल्वे, भुसावळ विभागाकडून प्राप्त सविस्तर प्रस्तावाच्या आधारे एकूण १६ महत्त्वाच्या रेल्वे लेव्हल क्रॉसिंगची ओळख पटविण्यात आली आहे. या ठिकाणी आरओबी, आरयूबी किंवा संबंधित कामांना आधीच मंजुरी देण्यात आलेली असून डिसेंबर २०२६ पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. काही ठिकाणी ही कामे कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण होणे शक्य नसल्यास, कुंभमेळ्याच्या सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत सदर लेव्हल क्रॉसिंग तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवून नियोजित पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे, ज्यामुळे रेल्वे वाहतूक सुरळीत राहील आणि सुरक्षिततेत वाढ होईल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गोदावरी जन्मोत्सवानिमित्त आज (दि. ३१) शहरातील 'या' वाहतूक मार्गात बदल

या पर्यायी मार्गांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची व्यवहार्यता तपासण्यासाठी तसेच वेळेत ना-हरकत प्रमाणपत्रे (NOC) देण्याच्या प्रक्रियेसाठी कुंभमेळा प्राधिकरणाने दि. २३ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सर्व संबंधित ठिकाणी संयुक्त सर्वेक्षणांचे आयोजन केले आहे. या सर्वेक्षणांमध्ये जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद तसेच इतर संबंधित यंत्रणा आणि मध्य रेल्वेचे अधिकारी सहभागी होणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  हुतात्मा दिन; शासकीय कार्यालयांत आज ११ वाजता दोन मिनिटे मौन पाळणार

या संयुक्त सर्वेक्षणांच्या माध्यमातून पर्यायी वाहतूक व्यवस्थेचे अंतिम रूप निश्चित करण्यात येणार असून स्थानिक गावांतील वाहतूक संपर्क, नागरिकांच्या दैनंदिन गरजा आणि विविध यंत्रणांमधील समन्वय यांचा आढावा घेण्यात येणार आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांना जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करून आवश्यक नकाशे, वाहतूक माहिती आणि प्रस्तावांसह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या सर्वेक्षणांची प्रगती तसेच तात्पुरत्या बंद व पर्यायी वाहतूक व्यवस्थेबाबतचे निर्णय दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या पुढील समन्वय बैठकीत आढावा घेण्यात येणार आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790