नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात गेल्या बुधवारी सकाळी (दि.७ ऑक्टोबर) रोजी असगर अली मुमताज मन्सुरी (वय ३२) याने तोंडाला लावायच्या मास्कच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन, आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करतेवेळी पोटामध्ये प्लॅस्टिक आवरणात सुसाईड नोट आढळून आल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
या नोटमध्ये काही अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख असून, ते अधिकारी टॉर्चर करत असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी सर्व बाजूंनी तपास करूनच पुढील कारवाई केली जाईल. अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिली आहे. मन्सुरी २०१० मध्ये मुंबईच्या कारागृहातून नाशिक मध्यवर्ती कारागृहात आला. कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मन्सुरीच्या स्वभावामुळे त्याच्याशी कोणी जास्त बोलत नव्हते. तसेच मन्सुरीने २०१४, २०१६ व २०१८ मध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला केला होता. म्हणून कोर्टाने देखील त्याला याबाबतीत फटकारले होते.