नाशिकमध्ये बनावट त्वचारोग तज्ज्ञ दाम्पत्यावर गुन्हा; क्लिनिक-अकादमीच्या नावाखाली फसवणूक

नाशिक । दि. ३ जानेवारी २०२६: मान्यताप्राप्त त्वचारोग तज्ज्ञ असल्याचा बनाव करून ‘स्किनरेला द एस्थेटिक स्किन अ‍ॅण्ड हेअर क्लिनिक’ या नावाने अकादमी सुरू करून नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता व वैध परवाना नसतानाही रुग्णांवर उपचार केल्याने काहींना गंभीर शारीरिक इजा व विद्रुपता झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संबंधित डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: आज (दि. ५) दुपारनंतर शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित जयदीप सलील घोषाल (५८) आणि सुजाता जयदीप घोषाल-पिंगे (५५) हे कॉलेज रोड परिसरात सदर क्लिनिक-अकादमी चालवत होते. दोघांनी संगनमताने स्वतःला तज्ज्ञ त्वचारोगतज्ज्ञ म्हणून सादर करत आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर वैद्यकीय प्रॅक्टिस केल्याचा आरोप आहे.

तपासात शैक्षणिक पात्रता व वैध परवाना नसतानाही प्रशिक्षण अकादमी सुरू करून रुग्णांकडून अनधिकृत शुल्क आकारण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. उपचारांदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याने रुग्णांना गंभीर दुखापती झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: तडीपार सराईत गुन्हेगारास गावठी कट्टा, काडतुसासह अटक

या प्रकरणी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयकुमार देवकर यांनी तक्रार दिली असून, त्याआधारे सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०२/२०२६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790