
नाशिक। दि. २६ डिसेंबर २०२५: पंचवटी परिसरात रिक्षात बसून प्रवाशावर धारदार शस्त्राने हल्ला करून पाच लाख रुपयांची लूट करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अंबड गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी किशोर बाबुराव वाकोडे (वय: २५, रा. भगवती नगर कोळीवाडा, भद्रकाली, जुना नाशिक) यास पनवेल तालुक्यातील ओवळे गावातून ताब्यात घेण्यात आले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ डिसेंबर २०२५ रोजी फिर्यादी प्रविणभाई माणिकलाल दवे (वय: ६५, व्यवसाय: डाळींब व्यापारी, रा. पिंपळगाव बसवंत, ता. निफाड) हे व्यापाऱ्यांना पैसे देण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन नाशिकला आले होते. सायंकाळी सुमारे ५.४० वाजता आडगाव नाका येथे बसमधून उतरून ते रिक्षात बसले.
पंचमुखी हनुमान मंदिर, पंचवटी परिसरात जात असताना रिक्षात आधीपासून बसलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. एकाने दवे यांचे हात पकडले, तर दुसऱ्याने डोक्याला काहीतरी वस्तू लावत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर धारदार शस्त्राने बरगडीवर वार करून पैशांची बॅग हिसकावून त्यांना चालत्या रिक्षातून खाली ढकलून दिले.
या घटनेनंतर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९५/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, मुख्य संशयित किशोर वाकोडे हा तेव्हापासून फरार होता.
दि. २५ डिसेंबर रोजी गुन्हे शाखा अंबड युनिटचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी पनवेल तालुक्यातील ओवळे गावात असल्याचे समोर आले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सापळा रचून एका चाळीतून त्याला अटक करण्यात आली. गुन्हा केल्यानंतर आरोपी उज्जैन, इंदूर (मध्यप्रदेश), बिदर (कर्नाटक), पुणे, नवी मुंबई व पनवेल अशा ठिकाणी पोलिसांना चकवा देत फिरत होता.
पोलिसांच्या तपासात हा आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले असून, शहरातील विविध पोलीस ठाण्यांत त्याच्यावर एकूण १२ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपासासाठी आरोपीस पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार: प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, योगेश चव्हाण, भुषण सोनवणे, अंमलदार: भगवान जाधव, चारूदत्त निकम व महिला पोलीस अंमलदार सविता कदम (सर्व नेमणूक: गुन्हे शाखा अंबड युनिट नाशिक) यांच्या पथकाने केली. या कामगिरीत तांत्रिक विश्लेषण विभागाच्या महिला सहायक पोलीस निरीक्षक जया तारडे त्यांच्या टीमने मदत केली.
![]()

