नाशिक | दि. २६ डिसेंबर २०२५: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबईस्थित भरारी पथकाने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरात परराज्यातून होणाऱ्या अवैध मद्यतस्करीला आळा घातला आहे. या कारवाईत दमण-निर्मित विदेशी मद्यासह एकूण १२ लाख ४४ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
पेगलवाडी (त्र्यंबक) परिसरात सायंकाळच्या गस्ती दरम्यान फर्शीवाले बाबा मंदिराजवळ संशयास्पदरीत्या उभी असलेली जीप (एमएच १९ बीएम २४०४) पथकाच्या नजरेस पडली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दादरा-नगर हवेली तसेच दीव-दमण येथे विक्रीसाठी असलेले विविध ब्रँडचे विदेशी मद्याचे ७५ बॉक्स आढळून आले. याप्रकरणी वाहनचालक मनोज जयदेव पाटील याला ताब्यात घेण्यात आले आहे.
अवैध मद्यनिर्मिती, विक्री व वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने टोल-फ्री व व्हॉट्सअॅप क्रमांक सुरू केले असून नागरिकांकडून मिळणाऱ्या तक्रारींवर कारवाई केली जात आहे. त्याच आधारे मुंबईच्या भरारी पथकाने त्र्यंबकेश्वर परिसरात कारवाई केल्याने स्थानिक पातळीवरील देखरेखीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
![]()

