नाशिक। दि. २५ डिसेंबर २०२५: शेअर ट्रेडिंग व्यवसायात जादा नफ्याचे आमिष दाखवून ऑनलाइन बनावट ट्रेडिंग अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून दोघांना सायबर गुन्हेगारांनी एकूण ५७ लाख ८२ हजार ७४ रुपयांचा गंडा घातला आहे.
तक्रारदार व त्यांच्यासोबत असलेल्या एका साक्षीदाराला व्हॉट्स अॅप कॉल करत संपर्क साधून सायबर गुन्हेगारांनी ट्रेडिंगविषयीची माहिती सांगितली. एपीके लिंक पाठवून बनावट ट्रेडिंग अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास भाग पाडले. दोघांनी जेव्हा हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केले तेव्हा सायबर गुन्हेगारांनी थेट २० टक्के नफा होईल, असे सांगून बँक खात्यात फिर्यादी तक्रारदार यांना २७ लाख ९४ हजार ७४ तर त्यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या साक्षीदारालाही याप्रकारे सप्टेंबरपासून तर आतापर्यंत २९ लाख ८८ हजार रुपये भरण्यास सांगितले. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मोबाइल क्रमांकाचा वापर केला.
कुठल्याही प्रकारचा शेअर ट्रेडिंगमध्ये नफा झाला नाही व भरलेली रक्कमही बुडाली, असे जेव्हा लक्षात आले, तेव्हा त्यांना आपण सायबर गुन्हेगारीचे बळी ठरलो, अशी खात्री पटली आणि त्यांनी शहर सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
![]()

