
नाशिक। दि. २४ डिसेंबर २०२५: संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वर पौष वारी यात्रात्सोव 12 ते 15 जानेवारी 2026 कालावधीत होणार असून आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी काटेकोरपणे नियोजन करून आराखडे सादर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालात यानिमित्त आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत जिल्हाधिकारी प्रसाद बोलत होते. जिल्हाधिकरी आयुष प्रसाद म्हणाले की, पौष वारी यात्रात्सोवासाठी प्रथम पोलीस विभागांनी नकाशासह आराखडा तयार करून तो इतर संबंधित विभागांना पाठवावा. या आराखड्याच्या धर्तीवर इतर विभागांनी सविस्तर बाबनिहाय स्थानिक नियोजन आराखडे तयार करून आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सादर करावेत. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आलेले आराखडे एकत्रीकरण करून त्यातुन निधी मागणीचे प्रस्ताव वेगळे करावेत. नियोजन करतांना यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना सर्व आवश्यक सोयी सुविधांचा समावेश करावा.
यात्रा कालावधीत कुशावर्त ते त्र्यंबकेश्वर मंदीर या मार्गात होणाऱ्या गर्दीच्या व वाहतुक नियोजनासाठी स्थानिक मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी समन्वायातून नियोजन करावे. तसेच मंदिरलगतचा परिसर फेरीवाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून नगरपरिषदेने दुकाने व स्टॉल्स यांची जागा निश्चित करावी. यात्रा ठिकाणी भाविकांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने सार्वजिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाने यात्रेसाठी येणाऱ्या अतिमहत्वाच्या व्यक्तीसाठी हेलिपॅडची व्यवस्था करावी. तयारी पूर्ण झाल्यानंतर 30 डिसेंबर रोजी होणा-या बैठकीत याबाबत अंतिम आराखडा सादर करावा.
पुर्वतयारी झाल्यानंतर 8 ते 10 जानेवारी दरम्यान सर्व विभागांनी स्थळभेट देवून स्थळभेटीदरम्यान नियोजन केल्यानुसार कामे झाल्याची खात्री करावी. यात्रा सुरू होण्याच्या एक दिवस आगोदर 11 जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रमुख अधिकारी स्थळभेट करून पाहणी करणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी सांगितले. यावेळी मंदिर संस्थानच्यावतीने करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती संस्थान पदाधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, आरोग्य सहसंचालक डॉ.योगेश चित्ते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमेश पवार, त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार गणेश जाधव, जिल्हा परिषदेचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळू पाटील, महानगरपालिकेचे कर अधिकारी संजय बैरागी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक लोणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.एस एस धरमेश्वर, सहाय्यक पोलीस निरिक्षक ग्रामीण श्रद्धा गंधास, सहाय्यक पोलीस निरिक्षक शहर अश्वीन निकम, संत निवृत्तीनाथ ट्रस्टचे विश्वस्थ नारायण मुठाळ, अध्यक्ष ॲड घोटेकर आदी उपस्थित होते.
![]()

