मुंबई/नाशिक। दि. २३ डिसेंबर २०२५: उत्तर भारतात तीव्र थंडीचा कहर सुरू असून, उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात जाणवत आहे. राज्यात थंडीची लाट पसरली असून, विशेषतः उत्तर-मध्य महाराष्ट्रात गारठ्याची तीव्रता अधिक आहे. या थंड वाऱ्यांचा प्रभाव वर्ष अखेरीस कमी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता असून, नववर्षाच्या स्वागताच्या काळात पारा काहीसा वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या तीन दिवसांत मुंबईसह राज्यातील विविध भागांमध्ये किमान तापमानात मोठी घट नोंदवली गेली आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीचा जोर कायम असून, मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये गारवा जाणवत आहे. तथापि, मुख्य शहर परिसरात तुलनेने थंडीची तीव्रता कमी असल्याचे चित्र आहे.
नाशिक शहर व परिसरात थंडीचा मुक्काम अद्याप कायम आहे. सोमवारी (दि. २२) किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. तापमानातील चढ-उतार सुरूच असून, गेल्या आठवड्यापासून नाशिककर थंडीचा सामना करत आहेत. किमान तापमान सातत्याने दहा अंशांच्या खाली राहिल्याने गोदाकाठ परिसरातही प्रचंड हुडहुडी भरत आहे.
रविवारनंतर सोमवारीही शहरात अधूनमधून ढगाळ वातावरण अनुभवास आले. सोमवारी सकाळी आर्द्रतेत वाढ होऊन ती ५६ टक्क्यांपर्यंत पोहोचली. सायंकाळी सात वाजल्यापासून पहाटे आठ वाजेपर्यंत थंडी अधिक जाणवत असल्याने नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर वाढवला आहे. सलग आठवडाभर थंडी राहिल्याने सर्दी खोकल्याचा रुग्णांमध्येही काहीशी वाढ झाली आहे.
दरम्यान, उत्तर भारतातील थंडीचा प्रभाव महाराष्ट्र ओलांडून तेलंगणा आणि कर्नाटकपर्यंत पोहोचला आहे. नाताळच्या कालावधीत महाराष्ट्रात थंडीच्या लाटेची शक्यता असून, विदर्भात रात्रीसह दिवसा देखील थंडीचा अनुभव येत आहे. २८ डिसेंबरपर्यंत खान्देशसह विदर्भात ‘थंड दिवस’ राहण्याची शक्यता असून, दिवसाही हुडहुडी भरू शकते, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. त्यांच्या मते, मुंबईसह कोकण भागात कमाल तापमान २८ ते ३० अंश, तर किमान तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील.
![]()

