
नाशिक। दि. २२ डिसेंबर २०२५: पंचवटीतील हिरावाडी येथे एका डाळिंब व्यापाऱ्याला रिक्षामध्ये बसण्यास भाग पाडून शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेले पाच लाख रुपये बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली होती. या जबरी लुटीनंतर फरार झालेला दुसरा संशयित आरोपी पवन नाना नेमणार (२६, रा. पिंपळगाव बसवंत) यास अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने सलग तीन दिवस पाठलाग करत नांदगाव येथे सापळा रचून ताब्यात घेतले.
पिंपळगाव बसवंत येथे राहणारे फिर्यादी डाळिंब व्यापाऱ्याची रेकी करून त्यांच्यावर पाळत ठेवून व्यापाऱ्याची लूट करण्यात आली होती. जबरी लुटीनंतर पवनही फरार झाला होता. तांत्रिक विश्लेषणाद्वारे अंबड गुन्हे शाखेकडून त्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात होता. गेल्या तीन दिवसांपासून पाठशिवणीचा खेळ सुरू असताना पवनने उल्हासनगर, चाळीसगाव येथून पोलिसांना चकवा देत होता.
येवला व नांदगाव पोलिसांच्या मदतीने अखेर अंबड गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, दिलीप सगळे, हवालदार प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे आदींच्या पथकाने नांदगावात सापळा रचला. तेथे पवन हा आला असता पोलिसांनी शिताफीने त्यास ताब्यात घेतले. पुढील तपासाकरिता त्यास पंचवटी पोलिसांच्या हवाली केले आहे.
दोन दिवसांची पोलिस कोठडी:
पवनने जबरी लुटीची कबुली दिली असून, पोलिसांनी त्यास जिल्हा न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्याच्यावर यापूर्वी पिंपळगाव बसवंत येथे अशाच प्रकारे रोकड असलेली बॅग पळवून नेण्याचा गुन्हा दाखल आहे.
![]()

