
नाशिक। दि. २२ डिसेंबर २०२५: शहर व परिसरासह जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेले असतानाही सराईत गुन्हेगार संशयित फरहान ऊर्फ दहशत कलीम शेख (२८) हा बायको संशयित मरियम ऊर्फ मनीषा फरहान शेख (२८, रा. दोघे नाईकवाडीपुरा) हिला घेऊन एम.डी. ड्रग्जची विक्री करण्यासाठी आला असता अमली पदार्थविरोधी पथकाने त्यांना रंगेहाथ जाळ्यात घेतले.
जुने नाशिकमधील नाईकवाडीपुरा भागात राहणारा सराईत गुन्हेगार फरहान याच्यावर यापूर्वीही चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न, आत्महत्येस प्रवृत्त करणे, शस्त्राने दुखापत करणे यासारखे पाच गंभीर स्वरूपाचे गुन्हे भद्रकाली, अंबड, मुंबईनाका या पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. पोलिस उपायुक्तांकडून त्यास तडीपार करण्यात आले आहे. अमली पदार्थविरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना गोपनीय माहिती मिळाली.
त्यांनी तातडीने गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांना कळविले. कोल्हे यांनी पथकाला सज्ज केले. सहायक निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, सहायक उपनिरीक्षक संजय ताजणे, देवकिसन गायकर, रंजन बेंडाळे, भारत डंबाळे, बळवंत कोल्हे, अर्चना भड आदींच्या पथकाने शनिवारी (दि.२०) रात्री रविशंकर मार्गावरील आदित्यनगर भागात सापळा रचला. फरहान हा विना क्रमांकाच्या बुलेट दुचाकीने त्याची बायको संशयित मरियम हिला घेऊन एम.डी. ड्रग्ज विक्रीसाठी आला. यावेळी पथकाने त्या दोघांना शिताफीने जाळ्यात घेतले.
अडीच लाखांचा माल जप्त:
फरहानची झडती घेतली असता त्याच्याकडे २५ हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम ड्रग्ज पावडर सापडली. पोलिसांनी ड्रग्जसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, असा एकूण २ लाख ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
![]()

