नाशिक। दि. २९ ऑक्टोबर २०२५: पीएल ग्रुप चालविणारे रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संशयित प्रकाश लोंढे व त्यांचा पुत्र दीपक लोंढे यांना पोलिसांनी यापूर्वीच सातपूर गोळीबार प्रकरणात अटक केलेली आहे. त्यांच्या टोळीवर ‘मोक्का’ नुसार कारवाईचा प्रस्तावही पोलिस आयुक्तांनी पाठविला आहे. एकापाठोपाठ या पिता-पुत्रांवर गुन्हे दाखल होत असताना गंगापूर पोलिस ठाण्यात आणखी एक खंडणीचा गुन्हा लोंढे पिता-पुत्रांसह अन्य तिघांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे.
त्र्यंबक रोडवर राहणाऱ्या एका रिक्षा चालकाच्या महिरावणी गावातील वडिलोपार्जित शेतजमिनीवर बेकायदेशीर कब्जा केला होता. जमिनीवर ताबा सोडण्यासाठी लोंढे पिता-पुत्रांनी ७५ लाखांची खंडणी मागून त्यापैकी २० लाख रुपये घेतले होते, असे फिर्यादीत म्हटले आहे.
तक्रारदार यास महात्मानगर येथे बोलावून घेत सिग्नलवर धमकावून खंडणीचे २० लाख रुपये उकळले. जमिनीचा ताबा मागितला तर जिवे ठार मारण्याची धमकी लोंढे पिता-पुत्रांनी दिली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी लोंढे पिता-पुत्रांसह बांधकाम व्यावसायिक संशयित आरोपी ईश्वरभाई मावाणी (रा. हिरावाडी), दीपक रतन मटाले (रा. कामटवाडे) आणि गणेश पंडित चव्हाण यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बनावट दस्तऐवज:
सहा संशयितांनी आपापसात कट रचून संगनमताने शेतजमिनीचे बनावट दस्तऐवज तयार केले. फिर्यादी तक्रारदार यांची संमती न घेता परस्पर महिरावणी येथील सर्व्हे क्र-२३३ मधील गट क्र.४४८ मधील वडिलोपार्जित शेतजमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केला असे तक्रारीत म्हटले आहे. (गंगापूर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २७२/२०२५)
पी.एल. टोळीविरुद्ध २० गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्रकाश लोंढे याचा मुलगा दीपक लोंढे याच्यासह १३ जणांना अटक करण्यात आली आहे. संशयित सराईत गुन्हेगार भूषण लोंढे याच्या मागावर अनेक पथके आहेत. – किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा
![]()

