नाशिकमध्ये हॉटेल्स,रेस्टॉरंट आणि बार सायंकाळी ७ पर्यंतच सुरु राहणार – जिल्हाधिकारी मांढरे

नाशिक (प्रतिनिधी): राज्य सरकारने हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बारच्या वेळा वाढवून दिल्या असल्या तरीही नाशिकमध्ये सकाळी ७ ते सायंकाळी ७ हीच वेळ कायम असणार आहे. अनलॉक ५ अंतर्गत परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामाध्यमातूनच हॉटेल रेस्टॉरंट आणि बार ५ ऑक्टोंबर पासून सुरु झाले आहेत.परंतु वेळेच्या बाबतीत नाराजी व्यक्त होत होती.

म्हणून ग्राहकांच्या आणि हॉटेल मालकांच्या विनंतीवरून राज्य सरकारने आता हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार उघडे ठेवण्याच्या वेळांमध्ये वाढ केली असून, नवीन वेळ सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत करण्यात आली आहे. परंतु नाशिकमध्ये मात्र, स्थानिक प्रशासनाने जुनीच वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ७ कायम ठेवली आहे.

लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून हॉटेल , रेस्टॉरंट  आणि बार व्यवसाय बंद होते. मात्र, अनलॉक ५ अंतर्गत ते सुरू करण्यात आले असून, राज्य सरकारने याबाबत नियमावलीही जाहीर केली आहे. त्यानुसार फक्त ५० टक्के क्षमतेने‌ हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरू करता येणार आहेत. मात्र, नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जारी ‌केलेल्या आदेशानुसार नाशिकमध्ये सकाळी ७ ते सायंकाळी ७ हीच जुनी वेळ कायम राहील असे सांगितले आहे. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी याबाबत नागरिकांना स्पष्टीकरण दिले आहे.

जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले, “ जिल्ह्यातील व्यवसायाच्या वेळांचे संदर्भात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर काही बाबी  स्पष्ट करणे गरजेचे वाटते. कुठे काय आदेश काढले जातात हे सर्वांना ज्ञात असते परंतु त्याचबरोबर त्या शहरांमध्ये किती लोक रोज मरत आहेत, त्यांचा रुग्णसंख्या आलेख कसा आहे याचीही माहिती घेणे आवश्यक असते. काही शहरांनी मध्यंतरी अचानक पूर्ण लॉक डाऊन केला होता. त्यावेळी आपण मात्र आपल्या “अन लॉक डाऊन” वर ठाम राहिलो कारण इतरांचे अंधानुकरण करणे कधीच समर्थनीय होत नाही. त्यामुळे आता इतर शहरांतील आपल्या सोयीचे आहे ते येथे करावे अशा मागण्या करणे योग्य नाही. शासन आणि प्रशासनाला साथरोग आणि व्यवसाय या दोन्हीचा समतोल साधायचा आहे. एकसूत्रता राहण्याच्या दृष्टीने व अंमलबजावणी करणे शक्य व्हावे यादृष्टीने सर्वच व्यवसायांच्या वेळा एकसमान ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे केलेली कार्यवाही योग्य आहे. वेळोवेळी योग्य व संतुलित निर्णय घेतल्यानेच आज जिल्ह्याची स्थिती नियंत्रणात आहे याची जाणीव असणे आवश्यक आहे ! ”

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790