नाशिक। दि. १३ सप्टेंबर २०२५: शहरात डिजिटल अरेस्टच्या घटनांची मालिका सुरूच आहे. याच पद्धतीने ७८ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला तब्बल ४४ दिवस घरातच ‘कैद’ करून २१ लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
सायबर भामट्याने स्वत:ला पोलिस अधिकारी म्हणून भासवून वृद्धाला व्हिडिओ कॉलद्वारे धमकावले. “तुमच्या नावावरून टेरर फंडसाठी मोठी रक्कम ट्रान्सफर झाली असून, मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अटक वॉरंट काढले गेले आहे,” असे सांगून त्यांना प्रचंड भीतीच्या छायेत ठेवण्यात आले.
त्यानंतर सायबर भामट्याने शासनाच्या खात्यात पैसे जमा करावे लागतील, अन्यथा अटक होईल, असे सांगत वृद्धाकडून हप्त्यांमध्ये आरटीजीएसद्वारे रक्कम वसूल केली. या काळात वृद्धावर कठोर देखरेख असल्याचा भास निर्माण करून १६ जुलै ते २८ ऑगस्ट दरम्यान रोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सतत व्हिडिओ कॉलवर ठेवण्यात आले. तब्बल ३८ दिवस सुरू असलेल्या या मानसिक छळामुळे वृद्धाने कुणालाही याबाबत माहिती दिली नाही.
या फसवणुकीत एकूण २१ लाख रुपये लुटले गेले असून, सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा कॉल्सना बळी न पडण्याचे आणि त्वरित सायबर क्राइम हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
![]()

