नाशिक: तीन मोटारसायकल चोर जेरबंद; साडेदहा लाखांच्या पंधरा दुचाकी हस्तगत !

नाशिक। दि. २० जुलै २०२५: शहर व परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत वाढ झालेली असताना गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने धडक कारवाई करत तिघा सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्या ताब्यातून सुमारे १० लाख ४० हजार रुपये किमतीच्या चोरीच्या पंधरा दुचाकी हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: गरजू रुग्णांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष… वाचा काय आहेत निकष…

शहरात वाढत्या दुचाकीच्या घटना रोखण्याकरिता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी गुन्हे शाखेला आदेश दिले होते. यानुसार गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाचे अंमलदार गारक्ष साबळे, राम बर्डे, विलास चारोस्कर, आप्पा पानवळ यांनी तपासचक्रे फिरवून गोपनीय माहिती मिळविली.

या माहितीवरून नीलगिरी बाग परिसरात पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांच्या पथकाने सापळा रचला. तेथे दुचाकीने आलेला संशयित सत्यम ऊर्फ देवा मिलिंद गरुड (२१, रा. ओझर), साहिल आझाद शेख (२१, रा. दहावा मैल) व एक विधिसंघर्षित बालक हे आले असता पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६० हजारांची दुचाकी घेतली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली. तसेच त्यांचे साथीदार यांनी शहर व ग्रामीण भागातून दुचाकी चोरी केल्याची माहिती दिली.

👉 हे ही वाचा:  नाशिक: शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याची मनपा आयुक्तांची सूचना

खेडगाव येथे संशयित विकास कुमावत (२३) यास दुचाकींची विक्री करण्यासाठी दिल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून ९ लाख ८० हजार रुपये किमतीच्या १४ दुचाकी जप्त केल्या. या गुन्ह्यात एका अल्पवयीन चोरालाही ताब्यात घेतले आहे. तिघांना सरकारवाडा पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790