नाशिक, दि. १३ जुलै २०२५: गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या भागात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने रविवारी आणि सोमवारी (दि. १४ जुलै) साठी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, हरसूल आणि वणी भागात ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
शहरात मागील चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून, दरम्यानच्या काळात फारशा सरी झालेल्या नाहीत. मागील आठवड्यात सलग कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र, ८ जुलैनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने धरणांतील विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला असून गंगापूर धरणातून होणारा विसर्ग पूर्णतः थांबवण्यात आला आहे.
मंगळवारी नाशिक शहरात फक्त ७ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर काही ठिकाणी हलक्या सरींचा अनुभव आला. बुधवारी मात्र हवामानात बदल होत लख्ख ऊन पडले आणि तापमानात वाढ होऊन कमाल तापमान २९ अंश सेल्सिअसवर पोहोचले. यामुळे वातावरणातील आर्द्रताही काही प्रमाणात कमी झाली आहे.