
नाशिक, दिनांक: २० मे २०२५: मंगळवारी सायंकाळी आकस्मिक आलेला पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे नाशिक शहरातील अनेक भागात मोठी झाडे थेट विद्युत वाहिन्यांवर उन्मळून पडल्याने व झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून विद्युत तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. यंत्रणेवर पडलेली झाडे बाजूला करून व फांद्या बाजूला काढून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी दुरुस्ती करीत महावितरणचे अभियंते जनमित्र व कर्मचारी कार्यरत आहेत.
यामध्ये नाशिक जिल्हा रुग्णालय विद्युत उपकेंद्रात असलेल्या आवारात झाड कोसळल्याने संपूर्ण विद्युत उपकेंद्राचा वीज पुरवठा खंडित झाला असून दुरुस्तीचे कार्य गतीने सुरू आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, गोल्फ क्लब, रविवार कारंजा, चांडक सर्कल, मुंबई नाका या भागाचा वीज पुरवठा प्रभावित झाला आहे.
यासोबतच घारपुरे घाट येथे सुद्धा ११केव्ही अशोक स्तंभ या विद्युत वाहिनीवर झाड पडले आहे. पंचवटी पोलीस स्टेशन समोर म्हसोबा मंदिर समोर झाड पडले असून त्यामुळे सिंहस्थ,रविवार कारंजा आणि पंचवटी या विद्युत वाहिन्यावरील वीज पुरवठा बंद झाला आहे.
तसेच म्हसरूळ उपकेंद्रातील दिंडोरी रोडवरील एकता नगर , गोविंद नगर मधील सद्गुरु नगर , सातपूर एमआयडीसी मधील नाइस एरिया आणि कॉलेज रोडवरील विशाल पॉईंट जवळ विद्युत यंत्रणेवर झाड पडल्याने गंगापूर रोडवरील वीज पुरवठा बंद झाला आहे. तसेच गंगापूर रोडवरील बळवंत नगर, मखमलाबाद, चांदशी गाव येथे सुद्धा झाडे पडल्याने वीज पुरवठा प्रभावित झाला आहे. झाडे आणि फांद्या बाजूला करीत दुरुस्ती करून वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे अभियंते व जनमित्र कार्यरत आहेत.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790