नाशिक (प्रतिनिधी): १४ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अपहरण करत तिला गुजरातला नेत तेथे हॉटेलमध्ये अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा न्यायालयाने ठोठावली. शुक्रवारी (दि. २४) जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती पी. व्ही. घुले यांनी ही शिक्षा सुनावली. सागर संतोष वाघ (२७, रा. हिंगणवेढे) असे या शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
अभियोग कक्षाने दिलेली माहिती अशी, १५ मे २०२३ रोजी आरोपी संतोष वाघने शेजारी राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अपहरण करत गुजरात येथे हॉटेलमध्ये अत्याचार केला होता. नाशिकरोड पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहायक निरीक्षक सुवर्णा हांडोरे यांनी तपास करत आरोपीच्या विरोधात सबळ पुरावे गोळा केले. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी सुरू होती.
न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिकारी यांनी सादर केलेल्या पुराव्यास अनुसरून २० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवली. दरम्यान, १४ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अपहरण करत अत्याचार केला होता. सरकार पक्षातर्फे अॅड. लिना चव्हाण यांनी कामकाज पाहिले. पैरवी धनश्री हासे, मोनिका तेजाळे यांनी पाठपुरावा केला.
![]()


