१४ पर्यंत शाळांनी सादर करावे प्रात्यक्षिकाचे गुण
नाशिक (प्रतिनिधी): सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेला येत्या १५ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे प्रात्याक्षिक परीक्षांचे गुण शाळांकडून १४ फेब्रुवारीपर्यंतच ऑनलाइन नोंदवायचे आहेत. तसे बोर्डाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
सीबीएससीच्या परीक्षा एप्रिलपर्यंत चालणार आहे. परीक्षा सुरक्षित आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर पेपर सुरु होण्यापूर्वी आणि पेपर झाल्यावर फोटो काढण्यात येणार आहेत. याबरोबरच सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही अनिवार्य असून, आत प्रवेश देण्यापूर्वी तीन वेळा तपासणी केली जाणार आहे. यंदा राज्य मंडळ आणि केंद्रीय शिक्षण मंडळ यांनी विद्यार्थ्यांना पुढील परीक्षांची तयारी वेळेत करता यावी, यासाठी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक १५ दिवस अलिकडे केले आहे.
त्यानुसार सीबीएससीच्या दहावी-बारावीच्या परीक्षांची तयारीही पूर्ण झाल्याचे बोर्डाच्या वतीने सांगण्यात आले आहे. परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांची ७५ टक्के हजेरी आवश्यक आहे. अत्यावश्यक कारणातच त्यात सूट देण्यात येईल.
हॉल तिकीट मिळेल शाळेत:
माध्यमिक आणिउच्च माध्यमिक शाळेतूनच परीक्षेसाठी आवश्यक असलेले हॉल तिकीट विद्यार्थ्यांना मिळेल. हे हॉल तिकीट परीक्षेच्या काही दिवस आधी देण्यात येतील. विद्यार्थ्यांनी आपले वर्गशिक्षक, प्राचार्य यांच्याकडून घ्यायचे आहे. हॉल तिकीट ऑनलाइन डाऊनलोड करता येणार नाही.
![]()


