नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकेश्वर येथील संतश्री निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सवास जाणाऱ्या भाविकांसाठी एस.टी.च्या नाशिक विभागीय कार्यालयातर्फे १६५ जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिकसह ग्रामीण भागातील काही आगारांतूनही जादा बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराज यात्रा २४ ते २६ जानेवारीदरम्यान पार पडणार आहे. यात्रेसाठी राज्यभरातून वारकरी, भाविक त्र्यंबकेश्वर येथे दाखल होत असतात. या भाविकांच्या सोयीसाठी एस.टी. महामंडळाने यंदाही विशेष नियोजन केले आहे. एस.टी.च्या वतीने मेळा बसस्थानक येथून दर पाच मिनिटाला बस सोडण्यात येणार आहे. यात्रोत्सवाचा मुख्य दिवस २५ जानेवारी असला तरी २४ ते २६ जानेवारीदरम्यान जादा बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. २७ बस मेळा बसस्थानक, नाशिकरोड, सातपूर या बसस्थानकांतून थेट त्र्यंबकेश्वरसाठी सोडल्या जातील.
याशिवाय घोटी, हरसूल, मोखाडा, पेठ इत्यादी मार्गांवरही भाविकांची गर्दी लक्षात घेऊन जादा बसेस सोडल्या जातील. सातपूर, तळेगाव फाटा अशा गर्दीच्या ठिकाणी पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एस.टी.चे विभागीय अधिकारी किरण भोसले यांनी केले आहे.
![]()


