नाशिक (प्रतिनिधी): गोदावरी नदीमध्ये प्लॅस्टिकद्वारे होत असलेल्या प्रदूषणावरून आयुक्त मनीषा खत्री यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर, महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन तसेच विभागीय अधिकाऱ्यांमार्फत प्रतिबंधित प्लॅस्टिक पिशव्या, वस्तूंचा वापर करणाऱ्यांविरोधात गेल्या दोन दिवसांत कारवाई करण्यात येत आहे. यात २५ जणांकडून सव्वा लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहे.
केंद्रीय व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांनुसार शहरात सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली असली तरी त्याची कठोरपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. आयुक्त खत्री यांनी प्लॅस्टिकचा तुकडाही गोदावरी मध्ये जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार शहरात प्रतिबंधित सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून सर्व विभागामधील भाजीपाला, फळविक्रेते, चिकन व मटण विक्रेते तसेच इतर दुकानांची गेल्या दोन दिवसात तपासणी करण्यात आली. या तपासणीत ६५.५ किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.
![]()


