
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने कामांचे नियोजन करतानाच ते वेळेत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी. तसेच याबाबत मुख्य सचिव आणि विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती नियोजन सभागृहात आज दुपारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. शर्मा बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, सहाय्यक जिल्हाधिकारी ओमकार पवार, अर्पित चौहान, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले की, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात मुख्य सचिवांकडे आढावा घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यानिमित्त होणारी कामे पर्यावरणपूरक, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असावीत. पायाभूत सोयीसुविधा निर्मितीवर भर द्यावा. प्रत्येक विभागाने कामांचा प्राधान्य क्रम ठरवून ही कामे अन्य निधीच्या स्त्रोतातून करता येतील का याचीही पडताळणी करावी. कुंभमेळ्यानिमित्त शहरात येणाऱ्या वाहनांसाठी वाहनतळ विकसित करण्याच्या कामास गती द्यावी. त्यासाठी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.
कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वर येथील पायाभूत सोयीसुविधांच्या उपलब्धतेसाठी नगरपालिकेने आराखडा तयार करून पाठपुरावा करावा. तेथील पायाभूत सोयीसुविधांच्या विकासालाही प्राधान्य देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले. महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणारे उपक्रम, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांनी आपापल्या विभागांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.
![]()


