नाशिक (प्रतिनिधी): दोन वर्षांपूर्वी एसएसडी नगर, तारवालानगर ते अमृतधाम लिंक रोडवरून रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वार महिलेला दुचाकीस्वार युवतीने धडक दिली होती. या धडकेत फिर्यादी सुनीता विजय आहेर (४८, रा. हिरावाडी) गंभीर जखमी झाल्या होत्या.
या खटल्यात सोमवारी (दि. ३०) जिल्हा न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांनी आरोपी तनया वाघ (२०, रा. पंचवटी) हिला दोषी धरले. तिला ५० हजार रुपये नुकसानभरपाईची रक्कम आहेर यांना देण्याचे आदेश दिले.
२९ नोव्हेंबर २०२२ साली तनया ही तिच्या ताब्यातील दुचाकीने (एमएच ४१-यू ३०१५) पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तारवालानगर अमृतधाम लिंकरोडवरून दुपारी प्रवास करीत होती. यावेळी आहेर यादेखील त्यांच्या ताब्यातील दुचाकीने (एमएच १५-जीपी ४४८०) एसएसडीनगर येथून रस्ता ओलांडत होत्या. यावेळी तनया हिने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत दुचाकीने आहेर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. यामुळे त्या खाली कोसळून गंभीर जखमी झाल्या होत्या.
याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन अंमलदार आर. एन. लिलके यांनी गुन्ह्याचा सखोल तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी अभियोक्ता श्रीमती एस. एस. चिताळकर यांनी युक्तिवाद केला.
यावेळी न्यायालयासमोर एकूण सहा साक्षीदार तपासले. तसेच तपासी अधिकारी लिलके आणि फिर्यादी यांचीही साक्ष नोंदविण्यात आली. परिस्थितीजन्य पुरावे व पंच, साक्षीदारांची साक्ष लक्षात घेता, न्यायालयाने दुचाकी चालक युवतीला दोषी धरले.