
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक-पुणे मार्गावरील बोधलेनगर येथील वयोवृद्ध महिलेच्या घरातून दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरणारी मोलकरीण व तिच्या मित्राला अवघ्या २४ तासांतच उपनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्या ताब्यातून चोरलेले मंगळसूत्रदेखील हस्तगत केले आहे.
बोधलेनगर येथे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक प्रतिमा महेश खैरनार (६५) यांच्या घरातील कपाटातील २७ ग्रॅम वजनाचे दोन लाख दहा हजार किमतीचे मंगळसूत्र चोरीस गेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, निरीक्षक संजीव फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, कर्मचारी विनोद लखन, सौरभ लोंढे, सूरज गवळी, संदेश रघतवान, सुनील गायकवाड, महिला पोलिस कर्मचारी मयुरी विझेकर यांचे पथक तपास करत होते.
या पथकाने संशयित अंजली रवींद्र निकम (१९, रा. बोधले नगर) हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मित्र संशयित राहुल गणेश जाधव (२१, रा. राजीव गांधी झोपडपट्टी, जेलरोड) याच्या सांगण्यावरून तिने घरातून हे मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली. (उपनगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ४६६/२०२४)