
नाशिक (प्रतिनिधी): ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा, अंबरनाथ, कळवा परिसरातून चोरी केलेल्या रिक्षांना बनावट नंबर लावून वापर करणाऱ्या संशयिताला भारतनगरमध्ये अटक करण्यात आली. रामनाथ भाऊराव गोळेसर (रा. विराज कॉलनी, कॅनडा कॉर्नर) असे या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीच्या ६ रिक्षा मिळून आल्या.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पथकाचे विशाल काठे यांना माहिती मिळाली रिक्षा चोरी करणारा भारतनगर येथे रिक्षा घेऊन फिरत असल्याचे समजले. पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखविताच सहा रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली. आणखी तीन रिक्षांचा तपास सुरू आहे. संशयिताकडून सहा लाख २५ हजारांच्या रिक्षा जप्त करण्यात आल्या. त्याला मुद्देमालासह शिवाजीनगर, अंबरनाथ, ठाणे शहर पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन वर्षांपासून वापर:
संशयित ठाणे येथून रिक्षा चोरी करून नाशिक आरटीओचा बनावट नंबर लावून रिक्षाचा वापर करत होता. संशयित अपघातात टोटल लॉस झालेल्या रिक्षांच्या नंबरचा वापर करत होता. जेणेकरून पोलिस आणि आरटीओ पकडणार नाही अशी शक्कल लढवत तो चोरीच्या रिक्षांचा वापर करत होता.