नाशिक (प्रतिनिधी): रिक्षा घेण्यासाठी ५० हजार रुपये आणले नाहीत म्हणून सासरच्यांकडून वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सविता भागवत घागरमाळे (रा. चुंचाळे घरकुल, अंबड) यांची मुलगी संजना अनिल साळवे (वय २२) ही जेलरोड येथील इंदिरा गांधी झोपडपट्टी परिसरात सासरी नांदत होती. त्यावेळी जेलरोड येथे राहणाऱ्या संशयित पती अनिल साळवे, सासरे तुकाराम सखाराम साळवे व सासू सुमन साळवे यांनी विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेतला, तसेच लग्नात संसारोपयोगी वस्तू दिल्या नाहीत व रिक्षा घेण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये आणले नाहीत म्हणून शारिरीक व मानसिक छळ करून शिवीगाळ व मारहाण केली.
वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून अखेर संजना साळवे हिने राहत्या घरातील किचनमधील छताच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने २ डिसेंबर २०२४ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात पतीसह सासू व सासरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (उपनगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ४६३/२०२४)