नाशिक (प्रतिनिधी): ऑनलाइन शेअर्स ट्रेडिंग करणे शहरातील तीन गुंतवणूकदारांना महागात पडले. संशयिताने विविध कंपनीचे शेअर्स घेण्याचा बहाणा करत वेगवेगळ्या खात्यात पैसे भरण्यास सांगून ३९ लाख ५१ हजारांचा गंडा घालण्यात आला.
सेवानिवृत्त अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ग्रुप आहे. त्यावर एका कंपनीचा मेसेज आणि लिंक आली. लिंक ओपन केल्यानंतर शेअर्स मार्केटसंदर्भात माहिती होती. लिंक पाठविणाऱ्याने संपर्क साधला. एका नामांकित कंपनीचा पोर्टफोलिओ दाखवत कंपनीचे अधिकृत ट्रेडर्स असल्याचे सांगितले. काही कंपनीच्या शेअर्सची माहिती देत त्यात ट्रेडिंग केल्याच जादा परतावा मिळेल, असे आमिष दाखविले.
अधिकाऱ्याने २३ लाख ७९ हजारांची गुंतवणूक केली. अशाचप्रकारे ग्रुपमधील अन्य सदस्यांनी १५ लाख ८० हजारांची गुंतवणूक केली. चार महिने होऊनही परतावा मिळत नसल्याने ओळखीच्या शेअर्स ब्रोकरसोबत संपर्क साधला. अशा प्रकारची कुठल्याही कंपनीचा पोर्टफोलिओ नसल्याचे सांगितले. यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.