
नाशिक (प्रतिनिधी): सोनसाखळी लुटीच्या गुन्ह्यातील किरण छगन सोनवणे याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे. संशयिताच्या चौकशीत सोनवणेसोबत शहरात २० सोनसाखळ्या लुटल्याची कबुली संशयिताने दिले. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने सिन्नर फाटा, मार्केट यार्ड येथे ही कारवाई केली. योगेश दत्तू गायकवाड (रा. सिन्नर) असे या संशयिताचे नाव आहे.
याबाबत उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने सराईत गुन्हेगार किरण सोनवणे यास पेठरोड येथे सिनेस्टाइल पाठलाग करत पकडले होते. त्याच्या चौकशीत संशयित योगेश गायकवाड आणि अन्य एकाचे नाव समोर आले. संशयित सिन्नरमधील राहणार असल्याने पथकाने त्याच्यावर पळत ठेवली.
सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर सोनवणेसोबत शहरात २० सोनसाखळ्या लुटल्याची कबुली त्याने दिली. त्याने घरफोडी, दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. सोनवणेचा कारागृहातून ताबा घेत दोघांची कसून चौकशी केल्यानंतर बीडमधील एकाचे नाव समोर आले आहे. संशयित फरार आहे.
लुटीच्या पैशांतून बांधले घर:
संशयित सोनवणेने सोनसाखळी लुटीच्या पैशांतून पेठरोड परिसरात घर बांधल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. गावठी कट्टा बाळगत परिसरातील नागरिकांना धमक्या देणे, कट्टा दाखवत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहे. संशयितांनी बीड, संगमनेर, जालना परिसरात लुटीच्या सोनसाखळ्या विक्री केल्याचे तपासात समोर आले आहे. संशयिताकडून २२ तोळे सोन्याची लगड जप्त करण्यात आली.
मोक्का कारवाई शक्य:
सराईत सोनवणे याने संघटीतपणे सोनसाखळी लुटीचे गुन्हे केले असल्याचे तपासात समोर आले आहे. सोनवणेविरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिस आयुक्त या टोळीवर मोक्का कारवाई करण्याची शक्यता असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक कड यांनी दिली.
सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, संदिप भांड, प्रदिप म्हसदे, विशाल काठे, महेश साळुंके, शरद सोनवणे, उत्तम पवार, रविंद्र आढाव, देविदास ठाकरे, नाझीमखान पठाण, धनंजय शिंदे, रोहिदास लिलके, विशाल देवरे, राजेश लोखंडे, पोलीस अंमलदार आप्पा पानवळ, मुक्तार शेख, राम बर्डे, राहुल पालखेडे, नितीन जगताप, विलास चारोस्कर, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, मपो.अं/मनिषा सरोदे, अनुजा येलवे, शर्मिला कोकणी, चालक श्रेणीपाउनि/किरण शिरसाठ, सुकाम पवार, समाधान पवार यांनी केली आहे.
![]()


