महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी येथे दीक्षांत संचलन संपन्न

नाशिक (प्रतिनिधी): तंत्रज्ञानाच्या युगात गुन्ह्याचे नवनवीन प्रकार उदयास येत आहेत, या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलीसांची भूमिका आव्हानात्मक असून या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अधिक सजगतेने काम करावे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांनी केले.

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथील मुख्य कवायत मैदान येथे प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र 124 च्या दीक्षांत संचलन कार्यक्रमात श्री. जगमलानी बोलत होते. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार, पोलीस अधीक्षक (नाशिक ग्रामीण) विक्रम देशमाने, उपसंचालक (बाह्यवर्ग) संजय बारकुंड, उपसंचालक (सेवांतर्गत प्रशिक्षण) अनिता पाटील, उपसंचालक (प्रशासन) डॉ. काकासाहेब डोळे, उपसंचालक (प्रशिक्षण व आय.टी.आय) प्रदीप जाधव यांच्यासह महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार व प्रशिक्षणार्थींचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यायाधीश जगमलानी हे प्रशिक्षणर्थी पोलीस उपनिरीक्षक यांना संबोधीत करतांना म्हणाले, नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ही पोलीस अधिकाऱ्यांचा समृद्ध वारसा चालविणारी अकॅडमी आहे. 12 महिन्यांचे यशस्वी प्रशिक्षण पूर्ण करीत आपण प्रशासनाच्या सेवेत दाखल होत असून कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नवीन पिढीचे साक्षीदार आहात. पोलीस प्रशासनात उत्तम उदात्त व उतुंग कार्य करण्यासाठी आपण सज्ज आहात. सरळसेवेतील ही पहिली तुकडी आहे असून सर्व प्रशिक्षणार्थींना सायबर गुन्ह्यापासून ते दहशदवाद्यांपर्यंत, आर्थिक गुन्हे, हिंसाचार, अमली पदार्थ गुन्हेगारी, फौजदारी न्याय व्यवस्था अधिक कार्यक्षम बनविणे. गंभीर गुन्ह्यांचा सखोल व निष्पक्ष तपास सुनिश्चित करणे, फॉरेन्सिक पथकाचा सहभाग, फॉरेन्सिक पुराव्यांचे संकलन व विश्लेषण प्रमाणित करणे आणि तपास वैज्ञानिक पद्धतीने करणे यासह नवीन कायद्यांचे प्रशिक्षण मिळाले आहे. या ज्ञानाचा उपयोग करून नवीन आव्हानांचा आपण सर्वजण सामोरे जाल असा विश्वास जगमलानी यांनी व्यक्त केला.

कायद्याच्या अंमलबजावणीत खरे नेतृत्व हे अधिकार किंवा शक्ती नसून नम्रतेने सेवा करणे, सहानुभूतीने सरंक्षण करणे व न्यायासाठी अतुट वचनबद्धतेने कार्य करणे हे आहे. पदाची जबाबदारी लक्षात घेवून समाजाविषयी सांप्रदायिक सद्भावना ठेवावी, सेवा करतांना उच्च दर्जाची सचोटी व चारित्र्य निष्कलंक ठेवावे. प्रशिक्षण हे योग्य व आयोग्य, विचार व आचार याचा अचुकपणा येण्यासाठी आवश्यक असलेला विवेक प्रदान करते तसेच व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास प्रशिक्षणाद्वारेच होतो. सदाचार सत्कर्म सतप्रवृत्तीकडे समाजाला घेवून जाण्यासाठी आपण सातत्याने प्रज्ञशिल रहावे.

समाजातील वाईट प्रवृत्तींना आळा घालून समाज सुव्यस्थित करण्याची जबाबदारी आपली आहे. पोलीस म्हणजे निष्ठा व निष्ठा म्हणजे श्रद्धापूर्वक स्विकारलेली जीवनाच्या व्रताची दिशा आहे, असे सांगत न्यायाधीश श्री. जगमलानी प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक यांचे सत्र क्रमांक 124 वे प्रशिक्षण सत्र 24 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झाले. या प्रशिक्षणात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून निवड झालेले 410 पुरूष व 210 महिला असे एकूण 620 पोलीस उपनिरीक्षकांनी यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणात 83 टक्के प्रशिक्षणार्थी हे पदवीधर व 17 टक्के पदव्युत्तर आहेत. 12 महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थ्यांना आंतरवर्गात भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम आणि स्थानिक व विशेष कायदे, फॉरेन्सिक सायन्स, सायबर क्राईम, गुन्हेगारी शास्त्र यासह बाह्यवर्गात पद कवायत, शस्त्र कवायत, शारिरीक प्रशिक्षण, गोळीबार सराव, योग इत्यांदींचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार यांनी अहवाल वाचनात दिली.

⚡ दीक्षांत संचलनात हस्ते गौरविण्यात आलेले कॅडेट
👉 नेहा दिलिप कोंडेकर: रिव्हॉल्वर ऑफ हॉनर – बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच
👉 अभय अशोक तेली: बेस्ट कॅडेट इन आऊटडोअर
👉 नेहा दिलिप कोंडेकर: सिल्व्हर बॅटन – बेस्ट कॅडेट इन स्टडीज
👉 कृष्णा भाऊसाहेब खेबडे: सेकंड बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच
👉 अक्षय रतन झगडे: डॉ. बी. आर. आंबेडकर कप – बेस्ट कॅडेट इन लॉ
👉 नेहा दिलिप कोंडेकर: अहिल्याबाई होळकर कप – ऑल राऊंड वूमन कॅडेट ऑफ द बॅच
👉 अभय अशोक तेली: “एन.एम. कामठे गोल्ड कप” बेस्ट कॅडेट इन राफल अँड रिव्हॉल्वर शूटिंग
👉 नेहा दिलिप कोंडेकर: यशवंतराव चव्हाण गोल्ड कप – ऑल राऊंड कॅडेट ऑफ द बॅच
👉 सागर तुळशिराम लगड: बेस्ट कॅडेट इन ड्रिल
यावेळी प्रशिक्षणार्थी पोलीस पोलीस उपनिरीक्षक तुषार संदिप घुगरे, जयंत अनिल येशीराव व गितांजली चंद्रकांत गारगोटे यांनी मल्लखांब व रोप क्लायबिंग प्रकाराची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. त्यांना प्रशिक्षक निलेश घाडगे यांनी प्रशिक्षित केले.
![]()


