नाशिक (प्रतिनिधी): भावजयीच्या भावाने घरातील तरुणीशी मैत्री करून तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार करून त्याचे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी ही पंचवटी परिसरात राहते. दि. २ जानेवारी ते ९ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत पीडितेच्या भावजयीच्या भावाने तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले. त्यावेळचे चित्रीकरण स्वतःच्या मोबाईलमध्ये करून ते व्हायरल करण्याची, तसेच पीडितेच्या बहिणीचा संसार मोडण्याची आणि पीडितेच्या वडिलांच्या बॅगमध्ये ड्रग्ज ठेवून त्यांना गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पीडितेवर स्वतःच्या राहत्या घरी व त्र्यंबकेश्वरजवळील वेगवेगळ्या लॉजेसमध्ये नेऊन पीडितवर वेळोवेळी अत्याचार केले.
त्याचप्रमाणे पीडितेच्या कॉलेजमध्ये जाऊन तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ व मारहाण केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक कदम करीत आहेत.