शिर्डी-नाशिक ई-बस थेट चौकशी कक्षावर धडकली; महिला भाविक ठार

नाशिक (प्रतिनिधी): शिर्डी येथून नाशिकला जाणारी ई बस (एम.एच.०४ एलक्यु ९४६२) महामार्ग स्थानकात शनिवार (दि. ७) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास फलाटावर चौकशी कक्षासमोर थांबली होती. काही वेळेने चालकाने बस सुरू करताच बस थेट चौकशी कक्षावर धडकली. या अपघातात आंध्रप्रदेशची महिला भाविक बस खाली सापडून जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडली. अंजली थट्टीकोंडा – नागार्जुन (२३, रा. पटछवा, जि. प्रकाशम, आंध्रप्रदेश) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या (दि. २६) विविध कार्यक्रमांचे आयोजन

शिर्डी ते नाशिक मार्गावर धावणारी ई बस सुरक्षितपणे मुंबई नाका परिसरातील महामार्ग बस स्थानकात पोहचली. चालक उमेश दत्तात्रय भाबड (३२, रा. वेहळगाव, नांदगाव) यांनी बस फलाटावर थांबविली. बसमधून प्रवाशी खाली उतरल्यानंतर ते लॉक सीट एंट्री करण्यासाठी बसखाली उतरले. काम आटोपून भाबड पुन्हा बसमध्ये चढले. त्यांनी बस सुरू करताच जोरदार आवाज झाला अन् काही क्षणातच बसने अचानक उसळी घेतली. काही सेकंदाच लोखंडी बार तोडून बस थेट चौकशी कक्षाच्या भिंतीवर धडकली. याच दरम्यान चौकशी कक्षाजवळच्या ओट्यावरून पती मुपाल्ला नागर्जुन (३०, रा. कोंडीकंडुर, जि. प्रकाशम) यांच्यासोबत चालत असलेल्या अंजली नागर्जुन यांना बसची जोरदार धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेअर ट्रेडिंगच्या आमिषातून ज्येष्ठ नागरिकाची ९९.५० लाखांची फसवणूक

नाशिक देवदर्शनाला आंध्रप्रदेशमधून आलेले अंजली थट्टीकोंडा नागार्जुन, मुपाल्ला हे जोडपे शिर्डी येथून श्री साईबाबांचे दर्शन घेऊन याच बसमधून प्रवास करून नाशिकला पोहचले होते. त्यांना त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी जायचे असल्याने ते चौकशीकक्षाकडे जात असताना ही दुर्घटना घडली. ज्या बसमधून लांबचा प्रवास करून आले त्याच बसने महिला भाविकाचा घात केला. अंजली व मुपाल्ला यांच्या लग्नाला अवघे अडीच वर्षे झाल्याचे कळते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790