नाशिक (प्रतिनिधी): नव्या वर्षातील प्रस्तावित प्रवासी भाडेवाढ टळणार असल्याची चिन्हे आहेत. दरवर्षी होत असलेला तोटा काही प्रमाणात भरून काढण्यासाठी प्रवासी तिकीटदरात वाढ करण्याचा सिटीलिंकचा प्रस्ताव राज्य शासनाच्या गृह व परिवहन विभागाने तिसऱ्यांदा फेटाळून लावला आहे.
सिटीलिंकचे तिकीटदर आधीच प्रवासी बसभाडे मूल्य दरसूचीच्या कमाल मर्यादेपर्यंत असल्याने भाडेदराची कमाल मर्यादा वाढवून देण्याची सिटीलिंकची मागणी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे नव्या वर्षातील प्रस्तावित प्रवासी भाडेवाढ टळणार आहे. सिटीलिंक अर्थात नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सद्यःस्थितीत २०० सीएनजी व ५० डिझेल अशा एकूण २५० बस शहर व लगतच्या ग्रामीण भागात चालविल्या जात आहेत. या बससेवेतून नाशिक महापालिकेला दरवर्षी कोट्यवधीचा तोटा सहन करावा लागत आहे. सिटीलिंकने केलेल्या ठरावानुसार दरवर्षी जानेवारी महिन्यात किमान पाच टक्के भाडेवाढीची मुभा आहे.
जानेवारी २०२२ मध्ये पाच टक्के, तर जानेवारी २०२३ मध्ये सुमारे १० टक्क्यांपर्यंत प्रवासी तिकीट भाडेदरवाढ करण्यात आली. मात्र, ही भाडेवाढ शासनाच्या बस प्रवासी भाडेमूल्य दरसूचीच्या कमाल मर्यादपर्यंत पोहोचल्याने जानेवारी २०२४ मध्ये सिटीलिंकला भाडेवाढ करता आली नाही.
त्यातून मार्ग काढण्याच्या दृष्टीने २ सिटीलिकने गृह व परिवहन विभागाच्या अपर सचिवांना प्रस्ताव सादर करीत भाडेदराची कमाल मर्यादा वाढविण्याची मागणी केली होती. मात्र, शासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे आता जानेवारी २०२५ मध्येही सिटीलिंकला प्रवासी भाडेवाढ करता येणार नाही. बस तिकीटदरासाठी शासनाच्या परिवहन खात्याने किमान व कमाल दराची सूची निश्चित केली आहे.
![]()


