नाशिक (प्रतिनिधी): शंकराचार्य न्यास आयोजित दोन दिवसीय कुर्तकोटी संगीत महोत्सवाचा प्रारंभ शनिवारी (दि. ७) संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. जुन्या गंगापूरनाक्याजवळ असणाऱ्या शंकराचार्य संकुल येथे आयोजित या कार्यक्रमात रसिकांना मुक्त प्रवेश आहे.
शनिवारी ग्वाल्हेर, जयपूर, आग्रा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका नुपूर काशिद-गाडगीळ यांच्या सुश्राव्य गायनाने महोत्सवास सायंकाळी ६ वाजता प्रारंभ होईल. त्यांना हार्मोनियमवर विख्यात कलाकार ज्ञानेश्वर सोनवणे, तर तबल्यावर तनय रेगे साथसंगत करतील. प्रथम सत्रातील दुसरे पुष्प आचार्य बिमलेंदू मुखर्जी यांच्या शिष्या सुप्रसिद्ध सतार वादक, बंगलोरच्या अनुपमा भागवत यांच्या सतार वादनाने गुंफले जाईल. त्यांना तबलासाथ अमित कवठेकर करतील.
दुसऱ्या सत्राचा प्रारंभ रविवारी (दि. ८) सकाळी ९.३० वाजता पद्मविभूषण पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य शंतनू गोखले यांच्या संतूर वादनाने होईल. त्यांना तबला साथ तनय रेगे करतील.
त्यानंतर सकाळी ११ वाजता पद्मभूषण उस्ताद राशीद खान यांचे शिष्य आणि नाशिकचे गानभूषण पं. प्रसाद खापर्डे यांचे गायन होईल. त्यांना हार्मोनियमवर ज्ञानेश्वर सोनवणे, तर तबल्यावर भरत कामत साथसंगत करतील.
![]()


