मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील सत्तास्थापनेचा पेच दोन आठवड्यांनंतर सुटला असून भाजप विधिमंडळ पक्षाचे गट नेते देवेंद्र फडणवीस हेच आज (ता.५) पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. सर्व आमदारांनी काल एकमुखाने फडणवीस यांची गटनेतेपदी निवड केली. यानंतर फडणवीस, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी राजभवनामध्ये जाऊन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला.
या सत्तास्थापनेच्या दाव्यानंतरही शिंदे यांची भूमिका मात्र गुलदस्त्यात राहिली. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी होण्यावरून शिंदे यांनी ‘वेट अँड वॉच’चे धोरण स्वीकारले आहे. भाजपकडून रात्री उशिरापर्यंत शिंदे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले जात होते. खुद्द फडणवीस यांनीही शिंदे यांची ‘वर्षा’ या निवासस्थानी भेट घेत त्यांच्याशी दीर्घकाळ चर्चा केली पण त्याबाबत उशिरापर्यंत तोडगा निघू शकला नाही.
आज (ता.५) सायंकाळी साडेपाच वाजता आझाद मैदानावर आयोजित ऐतिहासिक सोहळ्यात फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विविध भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि पक्षातील वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. भाजप विधिमंडळ पक्षाच्या गट नेत्याची निवड करण्यासाठी खास दिल्लीहून निरीक्षक म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे आले होते.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी यावेळी उपस्थित राहून केंद्र आणि राज्यातील समन्वयाची भूमिका पार पाडली. काल सकाळी अकराच्या सुमारास सुरूवातीला भाजपच्या कोअर समितीची बैठक पार पडली, त्यानंतर विधानभवनामध्ये झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये गट नेता म्हणून फडणवीस यांची निवड करण्यात आली. या बैठकीमध्ये चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. पंकजा मुंडे आणि इतर आमदारांनी त्याला अनुमोदन दिले.
यावेळी अर्थमंत्री सीतारामन, फडणवीस आणि रुपानी आदींची भाषणे झाली. मंत्री सीतारामन यांनी त्यांच्या भाषणात केंद्र आणि राज्यातील डबल इंजिनच्या सरकारमुळे प्रगतीला हातभार लागेल असा विश्वास व्यक्त केला. फडणवीस यांनी त्यांच्या भाषणामध्ये आमदारांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या ‘एक है तो सेफ है’च्या मंत्रामुळे आपला विजय झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.
नावे दिल्लीला पाठविली:
आजच्या (ता.5) शपथविधी सोहळ्यात किमान पाच ज्येष्ठ तसेच पाच तरुण आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जावी असा आग्रह भाजपकडून धरण्यात आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकांची संख्या अधिक असल्याने नेमके कुणाला निवडायचे? आणि डावलायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदासाठी चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन या ज्येष्ठ नेत्यांची नावे दिल्लीला पाठविली आहेत.
![]()


