नाशिक (प्रतिनिधी): औद्योगिक वसाहतीतील स्क्रॅप मटेरिअलची वाहतूक करणाऱ्या एका क्रमांकाच्या दोन ट्रक शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने पकडल्या आहेत. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करीत संशयित चालकाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, शासनाचा कर वाचविण्यासाठी ट्रकचालकाने एकच क्रमांक दोन ट्रकला वापरल्याचे तपासातून समोर आले आहे.
दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईमुळे औद्योगिक वसाहतीतील कंपन्या आणि स्क्रॅप मटेरिअल वाहून नेणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. अताउल्ला बैतुल्ला चौधरी (रा. विराटनगर, अंबड-लिंक रोड) असे संशयित ट्रकचालकाचे नाव आहे. अंमलदार नाजीम खान पठाण यांना अंबड औद्योगिक वसाहतीतून एकाच क्रमांकाच्या दोन ट्रकमधून स्क्रॅपचे मटेरिअलची वाहतूक केली जात असल्याची खबर मिळाली होती.
त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, नाझीम खान पठाण, प्रदीप म्हसदे, शरद सोनवणे, विशाल देवरे, अमोल कोष्टी, समाधान पवार यांच्या पथकाने अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉइंटकडून ग्लॅस्को पॉइंटकडे जाणाऱ्या रोडवर सापळा रचला. एकाच क्रमांकाचे दोन आयशर ट्रक (एमएच- ०४- केएफ- ७११४) जात होते. दबा धरून असलेल्या पथकाने दोन्ही ट्रक रोखले. दोन्ही ट्रकमध्ये स्क्रॅप मटेरिअल होते.
संशयित आयशर ट्रकचालक चौधरी याच्याकडे चौकशी केली असता त्याने शासनाचा कर वाचविण्यासाठी दोन्ही ट्रकला एकच क्रमांक लावण्याची कबुली दिली. पोलिसांनी २५ लाखांचे दोन्ही ट्रक जप्त केले असून, अंबड पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.
![]()


