नाशिक (प्रतिनिधी): आगामी कुंभमेळ्यास दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी राहिला असताना आचारसंहितेमुळे झालेला विलंब भरून काढण्यासाठी प्रशासन कामाला लागले असून उद्या (दि.३) विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या उपस्थितीत सिंहस्थ नियोजनाची बैठक होणार आहे.
यामध्ये मागील बैठकीत ठरल्यानुसार इतर हेड आणि योजनांतून जी कामे होणे शक्य आहे ती वगळून केवळ सिंहस्थासाठीचीच कामे नियोजित आराखड्यात ठेवण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे मनपाच्या आराखड्यातून कामे वगळली जाण्याची शक्यता आहे.
आचारसंहिता संपताच जिल्हा प्रशासनाने बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा, पुरातत्व विभाग, आरोग्य अन् इतर सर्वच विभागांना सिंहस्थाचीच कामे आपल्या आराखड्यात सादर करावी लागणार आहे. त्यानुसार हा आराखडा सादर करावा लागणार असून, त्यात इतर विभागांचीही कामे एकमेकांमध्ये धरली जाऊ नये यावरच निश्चिती होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शहरातील इंटरलिंक रस्ते अन् इतर बाबी या सार्वजनिक बांधकामद्वारे केली जाण्याची शक्यता आहे. मनपाला ती आपल्या आराखड्यातून वगळावी लागण्याची शक्यता आहे. महापालिकेने गेल्या आठवड्यात सादर केलेल्या आराखड्यात ७ हजार कोटींची कामे प्रस्तावित केली आहेत. त्यामध्ये शहरात नव्याने उभारायच्या पुलांसह मिसिंग लिंक, तपोवनात साधुग्राम, तात्पुरते सार्वजनिक शौचालये, ६० किलोमीटरचे बॅरिकेटिंग, साधुग्राममध्ये सेक्टर ऑफिसरसह रेशन दुकाने, बस वाहतूक या कामांचा त्यात समावेश होता.