नाशिक (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्हा थंडीच्या कडाक्याने गारठला होता. नाशिककरांना हुडहुडी भरली होती. किमान तापमानाचा पारा हा वेगाने घसरत थेट ८.९ अंशापर्यंत घसरला होता. रविवारी (दि.१) किमान तापमानात काही अंशी वाढ झाली असून पारा ११.५अंशापर्यंत पोहचला. तसेच कमाल तापमानातसुद्धा एक अंशाने वाढ झाली.
तर आज (दि. २ डिसेंबर २०२४) नाशिकला १४.६ इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शहरात आतापर्यंत दहा अंशांच्या खाली किमान तापमानाचा पारा घसरलेला नव्हता. मात्र, त्यानंतर उत्तर भारतातून शीतलहरींचा वेग प्रचंड वाढल्यामुळे पारा वेगाने घसरू लागला आहे. शनिवारी थेट ८.९ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले. यामुळे दिवसाही वातावरणात गारवा जाणवत होता.
शनिवारी कमाल तापमान २७.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते. रविवारी २८.२ अंश सेल्सिअस इतकी कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. थंडीची तीव्रता काही अंशी घटली असली तरी वातावरणात आर्द्रता मात्र अधिक वाढली आहे. रविवारी सकाळी आर्द्रता ८९ टक्के आज सकाळी ८७ टक्के इतकी नोंद झाली.
उत्तर महाराष्ट्रात काय परिस्थिती:
पुढील आठवड्यात कमाल-किमान तापमानात वाढ होणार आहे. ‘फिंजल’ चक्रीवादळ कमकुवत होत त्याचे हवेच्या अतितीव्र कमी दाब क्षेत्रात रविवारी रूपांतर झाले आहे. त्याच्या प्रेरित परिणामातून राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह पाच जिल्ह्यांत या वातावरणाचा थंडीवर फारसा प्रभाव पडणार नाही असे वाटते, अशी माहिती हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली.