नाशिक (प्रतिनिधी): शहर व परिसरात मागील दोन ते तीन दिवसांपासून किमान तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात १६ अंशांपर्यंत असलेले किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. १२.४ अंश सेल्सिअस इतके तापमान आज (दि. २२) नोंदविले गेले. थंडीचा कडाका वाढू लागल्याने नाशिककरांनी उबदार कपड्यांचा वापर वाढविला आहे.
मागील आठवड्यात शनिवारी (दि. १६) किमान तापमान १६.८ अंश तर रविवारी १७.७ अंशांपर्यंत किमान तापमानाचा पारा वाढला होता. तसेच अंशतः ढगाळ हवामान राहत होते; मात्र सोमवारनंतर वातावरणात वेगाने बदल होण्यास सुरुवात झाली. थंडीसाठी हा आठवडा पोषक असून, आठवडाभर थंडीची तीव्रता वाढणार आहे. दोन आठवड्यांपूर्वी राज्यात पुन्हा नाशिकला नीचांकी गेल्या पाच दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढलेला होता. किमान तापमानाचा पारा १३.२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता.
सलग पाच दिवस थंडीचा कडाका नागरिकांनी अनुभवला होता. त्यानंतर पुन्हा चार दिवस थंडी गायब झाली होती. आता पुन्हा मंगळवारपासून किमान तापमानात वेगाने घसरण होऊ लागली आहे. शहराचे तापमान १५ अंशांवरून मंगळवारी थेट १२.७ अंशांपर्यंत खाली घसरले होते. यावरून थंडी वाढल्याचे दिसून येते. पहाटे थंडीचा कडाका जाणवत असून, सायंकाळी साडेसात वाजेपासून पुढे हवेत गारठा निर्माण होण्यास सुरुवात होते. मंगळवारी सकाळी वातावरणात ८४ टक्के इतकी आर्द्रता मोजण्यात आली.