नाशिक (प्रतिनिधी): वर्क फ्रॉम होम जॉब देण्याचे आमिष देत एका व्यावसायिकाला विविध टास्क पूर्ण करण्यास सांगून ४१ लाख ७१ हजारांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार, जून २०२३ ते ३ ऑक्टोबर या कालावधीत मोबाइलवर एक मेसेज आला. लिंकमध्ये वर्क फॉर्म होम पार्टटाइम जॉबची माहिती देण्यात आली. लिंकला प्रतिसाद दिल्यानंतर संशयित मोबाइलधारक दीप्ती, संदीप सिंग, अरुण शहाजी यांनी कॉल करत घरून काम केल्यास तुम्हाला चांगले उत्पन्न सुरू होईल, असे सांगून सोशल मीडियावरील वॉल, विविध शॉपिंग कंपनीच्या प्रॉडक्टबाबत अभिप्राय पाठविणे आदी कामे सांगत एक लिंक पाठवली. व्यावसायिकाने ही लिंक उघडली. एक कंपनीच्या प्रॉडक्टची माहिती दिली. व्यावसायिकाने उत्तर दिल्यानंतर संशयितांनी व्यावसायिकाच्या खात्यात १०० रुपये जमा केले.
अशाचप्रकारे तुम्ही वर्क फॉम होम कामातून पैसे कमावू शकता, असे आमिष दिले. व्यावसायिकाने काम करण्यास होकार दिला. संशयितांनी सुरुवातीला १०० ते ५०० रुपये पाठवले, यानंतर पेड टास्क देत वेळोवेळी ऑनलाइन पैसे भरण्यास भाग पाडले. टास्क पूर्ण केल्यानंतर जमा झालेले पैसे बँकेत जमा करण्यास सांगितले असता संशयितांनी आणखी पैसे भरण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांत तक्रार दिली.
![]()


