नाशिक (प्रतिनिधी): उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सलग दुसऱ्या दिवशी आगरटाकळी भागातील वैद्यवाडी येथे पोलिसांनी गुरुवारी (दि.१४) छापा टाकून सुमारे १ लाख ७२ हजार २८० रुपये किमतीचा दडवून ठेवलेला अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी संशयित दातार लोखंडे यास ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मागील ४८ तासांत उपनगर पोलिसांकडून अवैध मद्यसाठ्याविरोधी दुसरी मोठी कारवाई आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अवैध धंद्यांविरोधी कारवाईला गती देण्यात आली आहे.
मतदानाचा दिवस जवळ येत असल्याने पोलिस यंत्रणा अधिकाधिक सतर्क झाली आहे. बुधवारी उपनगर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत संशयित अशोक सातभाई यांच्या गाळ्यातून दारूच्या बाटल्यांनी भरलेली सुमारे ९८ खोक्यांचा मद्यसाठा हस्तगत केला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच उपनगर पोलिस ठाण्यातील अंमलदार पंकज कर्पे यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे परिमंडळ- २च्या उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, संजय फुलपगारे आदींच्या पथकाने वैद्यवाडी येथील संशयास्पद घराची घरझडती वॉरंटद्वारे तपासणी केली असता.
घरात मद्यसाठा आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. या मद्यसाठ्याबाबत कुठलाही परवाना त्यांच्याकडे आढळून आला नाही किंवा त्यांना त्याबाबतची माहिती देता आली नाही, म्हणून पोलिसांनी लोखंडे याच्याविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात राज्य दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
जप्त केलेला मुद्देमाल असा:
देशी दारूने भरलेल्या बाटल्यांचे १९ खोके
बियरच्या बाटल्या, टीनचे १३ खोके.
व्हिस्कीच्या बाटल्यांचे आठ खोके.
व्हिस्कीच्या सुमारे १२५ सुट्या बाटल्या.