नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत अवैध धंदे करणारे तब्ब्ल ३८९ गुन्हेगार तडीपार !

नाशिक (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवस जवळ येत असून, शहर पोलिस प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अवैध धंदे करणाऱ्या सुमारे ३८९ सराईत गुन्हेगारांना दहा दिवसांकरिता शहराबाहेरचा रस्ता दाखविला आहे.

या सर्व गुन्हेगारांना शनिवारपासून (दि. १६) शहर पोलिस आयुक्तालयाची हद्द सोडून जाण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. मतदानाची प्रक्रिया शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत निर्विघ्नपणे पार पडावी, कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उ‌द्भवू नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात येत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकच्या सायकलपटूंनी रॅलीतून दिला 'माझा भारत - माझं मत'चा संदेश

चोख बंदोबस्ताचे नियोजन व आखणीसह प्रतिबंधात्मक कारवायांना वेग देण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून कर्णिक यांनी पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत यांच्यासह सर्व सहायक पोलिस आयुक्तांची बैठक घेतली. या बैठकीत सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कायदा कलम १६३नुसार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ.गेडाम यांच्या हस्ते ध्वजारोहण

परिमंडळ-१ व परिमंडळ- २मधील सर्व पोलिस ठाणेनिहाय सराईत गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यापैकी बुधवारी (दि.१३) ३८९ इसमांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. या इसमांनी शनिवारी शहर सोडून जायचे असून, २४ तारखेपर्यंत पुन्हा शहरात प्रवेश करायचा नाही, असे त्यांना बजावण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आता निदान निवडणुकीपर्यंत शहरात शांतता राहील.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790