नाशिक (प्रतिनिधी) : म्हसरूळ येथील विवाहितेचा वर्षभरापूर्वी इगतपूरीनजीक मुंढेगाव येथे अपघात झाला होता. मात्र हा अपघात नसून पती निलेश याने महिलेच्या डोक्यात हातोडा मारून खून केल्याचा खुलासा घोटी पोलिसांनी केला. निलेश यानेसुद्धा पत्नीच्या अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून खून केला असल्याची कबुली दिली. याप्रकरणी घोटी पोलीसांनी छडा लावत मयत महिलेच्या पतीसह त्याच्या दोन नातलग साथीदारांना अटक करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी जुलै २०१९ मध्ये अज्ञात वाहनाने ओव्हरटेक करताना बोलेरो जीपचा अपघात झाला होता या अपघतात २२ वर्षीय प्रियंका लहाने ही जागीच ठार झाली असल्याचा बनाव करण्यात आला होता. या अपघताचा गुन्हा देखील नोंदवला गेला होता. मात्र हा अपघात संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी तपासा दरम्यान चौकशी साठी महिलेचा पती नीलेश यास ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. निलेश लहाने याने तुझी आई आजारी आहे तिला एसएमबीटीला अँडमिट केले आहे. त्यासाठी जेवणाचा डबा घेऊन जाऊ असे सांगून बोलेरो जीप मध्ये नीलेश आणि त्याची पत्नी प्रियंका आणि आत्तेभाऊ शरद बोडके (२८) हे आणि मागील गाडीत नातलग यादव बोडके (४७) असे जात होते. मुंढेगाव जवळ प्रियंकाच्या डोक्यात हातोडी मारून हत्या केली त्यानंतर जवळ उभे असलेल्या वाहनावर आदळुन अपघात झाला अशी बतावणी केली.