नाशिक (प्रतिनिधी): मतदार नोंदणीचा अर्हता यापुर्वी दिनांक 1 जानेवारी अशी असल्याने मतदार नोंदणी करतांना प्रत्येक वर्षाच्या 1 जानेवारीस जे युवक / युवती वयाची 18 वर्षे पुर्ण करीत आहेत त्यांना मतदार म्हणून नोंदणी करता येत होती. युवकांचा मतदार नोंदणीतील सहभाग वाढवा व युवकांनी मतदानासाठी पुढे यावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक वर्षात 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर असे चार आर्हता दिनांक निश्चित केले आहे.
या चार अर्हता दिनांकास जे युवक / युवती वयाची 18 वर्षे पुर्ण करीत आहेत त्यांना आता मतदार नोंदणी करता येणार आहे. यामुळे निश्चित नाशिक जिल्ह्यतील युवा, महिला व नवमतदारांची संख्येत वाढ झाली असून येत्या 20 नोव्हेंबर 2024 विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवून मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
मतदार नोंदणी प्रक्रीयेत भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 चे कलम 14 आणि त्यानुसार मतदार नोंदणी नियम,1960 मध्ये महत्वाचे बदल सन 2022 मध्ये केले. दि. 1 ऑगस्ट 2022 पासुन या नियमांची अंमलबजावणी आयोगाच्या निर्देशाप्रमाणे करण्यात आली आहे. यावर्षी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक माहे मार्च ते मे 2024 या कालावधीत संपन्न झाली. राज्यात माहे एप्रिल आणि मे मध्ये ज्या मतदारसंघात निवडणूक झाली त्या ठिकाणी 1 एप्रिल 2024 या अर्हता दिनांकास ज्या युवक युवतींनी वयाची 18 वर्ष पुर्ण केली त्यांना आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार म्हणून नोंदणी करता आली व मतदान देखील करता आले.
आता महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. आयोगाचे निर्देशाप्रमाणे दिनांक 1 जुलै आणि दिनांक 1 ऑक्टोबर या अर्हता दिनांकास ज्या युवक युवतींनी वयाची 18 वर्ष पुर्ण केली त्यांना मतदार म्हणून नोंदणी करता आली असुन आता मतदान देखील करता येणार आहे.
आयोगाने घेतलेल्या या महत्वाच्या निर्णयाचा फायदा जिल्ह्यातील अनेक युवक युवतींना झाला आहे. यामुळे युवकांच्या मतदार नोंदणीत वाढ होत असुन युवकांना लोकशाही प्रक्रियेत अत्यंत महत्वाचा भाग असलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांत त्यांचा सहभाग नोंदवता येत आहे. 1 जानेवारी 2024 रोजी वय वर्षे 18-19 या वयोगटाचा जिल्ह्यातील मतदार संख्येतील सहभाग 1.25 टक्के होता तो आता 1 ऑक्टोबर 2024 रोजी वाढून 2.26 टक्के इतका झाला आहे. आयोगाने मतदार नोंदणीसाठी युवकांना दिलेल्या संधीचा फायदा घेऊन युवकांनी मतदार नोंदणीत आणि मतदानात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
जिल्ह्यातील महिला देखील मतदार नोंदणीत मागे नाहीत. जिल्ह्यातील मतदार यादीतील स्त्री-पुरूष प्रमाण (एक हजार पुरूषांमागे असलेले स्त्रियांचे प्रमाण – Gender Ratio ) जे 1 जानेवारी 2024 रोजी 919 होते ते 30 ऑगस्ट रोजी 930 आणि 9 ऑक्टोबर रोजी 934 इतके झाले आहे. जिल्ह्याचे जनगणनेनुसार (Census) स्त्री-पुरूष प्रमाण 934 आहे. आता जनगणनेनुसार आणि मतदार यादीनुसार जिल्ह्याचे स्त्री-पुरूष प्रमाण सारखे म्हणजेच 934 इतके झाले आहे. जिल्ह्यातील युवती आणि स्त्रीयांनी मतदार नोंदणीत मोठी आघाडी घेतली आहे.
वाढत्या मतदार नोंदणीचे फलित मतदानाच्या वाढलेल्या प्रमाणात दिसुन आले. सन 2019 च्या लोकसभा निवडणूकीत जिल्ह्यात सरासरी 61.74 टक्के मतदान झाले होते. आता लोकसभा निवडणूक 2024 मध्ये जिल्ह्यात 64.2 टक्के मतदान झाले. मागील निवडणूकीपेक्षा 2.47 टक्क्याने मतदानाची टक्केवारी वाढली. याचे सर्व श्रेय जिल्ह्यातील मतदारांना आहे. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास मतदारांनी अभुतपुर्व प्रतिसाद दिल्यामुळेच मतदान वाढले आहे.
सन 2019 चे महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी जिल्ह्यात सरासरी 62.60 % मतदान झाले होते. आता दि. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या निवडणूकीसाठी मतदान होत आहे. यात आता आपण सर्व मतदारांच्या सहभागामुळे वाढ निश्चितच होणार असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी व्यक्त केला आहे.
![]()


