नाशिक (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अवैध शस्त्र बाळगाणाऱ्या गुन्हेगारांच्या घराची झाडाझडती कारवाई करण्यात आली. रेकॉर्डवरील २०७ गुन्हेगारांच्या घरी चौकशी करण्यात आली. मिळून आलेल्या ३६ गुन्हेगारांकडून चौकशी फॉर्म भरून घेण्यात आला.
४४ तडीपार गुन्हेगारांच्या घरी चेकिंग करण्यात आली. शस्त्र बाळगण्याचे गुन्हे दाखल असलेल्या ६२ गुन्हेगारांच्या घरझडती घेण्यात आली. उपआयुक्त परिमंडळ २ च्या मोनिका राऊत यांनी नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प, अंबड, इंदिरानगर, सातपूर या पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी, शेखर देशमुख यांच्यासह वरिष्ठ निरीक्षक कारवाईत सहभागी होते.
विनापरवानगी मद्य विक्री करणाऱ्या ५ इसमांवर कारवाई करण्यात आली. कोटपा कायद्यांतर्गत ७ जणांवर कारवाई करण्यात आली. विनाकारण फिरणाऱ्या १३ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. स्टॉप अँड सर्चमध्ये ९७ दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात आली.